महिन्यातून एकदा जनता दरबार घ्यावा

0

पिंपरी-चिंचवड : शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी महापौर व महापालिका आयुक्तांनी महिन्यातून एकदा तरी जनता दरबार घ्यावा, अशी मागणी निगडीतील डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपने केली आहे. या मागणी संदर्भात ग्रुपच्या वतीने महापौर नितीन काळजे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, या मागणीची दखल घेऊन महापौर काळजे यांनी, जनता दरबार घेण्याची मागणी योग्य आहे. त्यासंदर्भात योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

नागरिकांच्या समस्या समजतील
नागरिकांना काय समस्या आहेत, हे जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी जनता दरबार ही संकल्पना राबविली जाते. जनता दरबाराच्या माध्यमातून महापौर आणि आयुक्तांना लोकांच्या समस्या समजतील. जनता दरबारात असंख्य नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात. त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्यास प्राधान्य देण्यासाठी तसेच नागरिकांनी केलेल्या सूचनांवर लगेच कार्यवाही करता येईल. शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनाला समजतील. तसेच त्या विषयांवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ते विषय महासभेपुढे आणता येतील, असे निवेदनात म्हटले आहे.

नगरसेवकांचे एकमेकांकडे बोट
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने यंदा महापालिकेची निवड झाली. त्यामुळे अनेक प्रभागात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभागातील नागरिक एखाद्या नगरसेवकांकडे तक्रार घेऊन गेल्यास, दुसर्‍या नगरसेवकाकडे पाठविले जाते. नगरसेवक एकमेकांकडे बोट दाखवून काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. नगरसेवकांच्या राजकारणामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे जनता दरबार आयोजित करण्याची गरज आहे.