नाशिक: शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना धोबीपछाड देत भगवा फडकावला. शिवसेनेचे किशोर दराडे दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. दरम्यान एक महिन्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत किशोर दराडे यांचे मोठे बंधू नरेंद्र दराडे विजयी झाले होते. आज एक महिन्याच्या अंतराने एकाच घरात दोन आमदार झाले असून, दोघेही वरीष्ठ सभागृहात म्हणजेच विधानपरिषदेत दिसणार आहेत.
पहिलीच वेळ
दोन भाऊ विधानपरिषदेच्या सभागृहात एकाच वेळी जाण्याची बहुदा पहिलीच वेळ आहे. याआधी दोघेही नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात होते. दोघेही एकेकाळचे पैलवान असून, आता त्यांनी विधानपरिषदेचा राजकीय आखाडाही गाजविला. दोघांच्या विजयाने शिवसेनेची विधीमंडळातील ताकद वाढली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रमधील सर्व मंत्री, आमदार, खासदार यांची बैठक घेऊन रणनीती आखली होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः नाशिकमध्ये येऊन आढावा घेतला होता. भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची करूनही भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्यानं, भाजप विषयीचा रोष मतपत्रिकेतून दिसून येत आहे.