मुंबई-मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्गीय आयोग सर्व बाबी तपासून पाहत आहे. महिनाभरात आयोगाचा आहवाल येणार आहे. त्यानंतर आरक्षणाबाबतच्या सर्व वैधानिक बाबी तपासून त्याबाबत सभागृहात चर्चा होईल. त्यामुळे सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मराठी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी बैठकीत ही चर्चा झाली.
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार नाही
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह नारायण राणे देखील उपस्थितीत होते. मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही अशी व्यवस्था केल्यानंतरच मेगा भरती केली जाईल. त्यामुळे त्यांनी या भरतीबाबत काळजी करु नये. त्याचबरोबर मराठा आंदोलनादरम्यान, तरुणांवर दाखल करण्यात आलेले ३०७ सह सर्व प्रकारच्या केसेस मागे घेण्यात येतील. मात्र, ज्यांनी पोलिसांवर हल्ले आणि जाळपोळींसारखे प्रकार केले आहेत, ते स्पष्टपणे व्हिडीओंमध्ये दिसत आहेत त्यांच्यावरील गु्न्हे कुठल्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचबरोबर आंदोलनात काही संशयीत लोक घुसल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत यातील घुसखोरांबाबतची पडताळणी करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काकासाहेब नामक तरुणानाचा झालेला मृत्यू दुर्देवी असून तरुणांनी अशा गोष्टी करु नयेत, समन्वयकांनी याची जबाबदारी घेऊन राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आमदारांनी राजीनामे देऊ नये
मराठा समाजाच्या ज्या आमदारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भावनेच्या भरात राजीनामे दिले आहेत. त्यांच्याशीही आम्ही चर्चा केली आहे. आपल्याला सर्वांना मतदान करुन समाजाला आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे राजीनामे देऊन हे शक्य होणार नाही. तेव्हा आपण सभागृहात आरक्षणाच्या बाजूने मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.