महिलांचा समावेश हक्कासाठी मराठा महिला क्रांती मोर्चा राज्यभर संघटन उभारणार

0
पिंपरी :छ.शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिला प्रथम स्थानावर होत्या. त्यांच्या प्रेरणेनेच महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने आतापर्यंत मराठा समाज आरक्षण व इतर न्याय हक्क मागण्यांसाठी राज्यभरातून अठ्ठावन्न मूकमोर्चे काढले. या मूकमोर्चानंतर ठोक मोर्चेदेखील काढले. नऊ ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी झालेल्या महामोर्चातून समाजाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. मागील तेरा महिन्यात मराठा समाजाच्या पदरात मात्र काहीही पडलेले नाही. सरकार फक्त वेळ काढूपणाची भूमिका घेत आहे. या सर्व आंदोलनांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. परंतू समाजाचे प्रतिनिधी म्हणून जे समन्वयक काम पाहत आहेत त्यामध्ये महिलांचा समावेश करून घेण्यात आला नाही. आता राज्यभरातून सकल मराठा महिला क्रांती मोर्च्याच्यावतीने राज्यव्यापी संघटन उभारण्यात येणार आहे. आगामी सर्व आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग, महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 11 सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये बैठक होणार आहे. सर्व जिल्ह्यांत व शहरांत या महिन्यात बैठका घेऊन समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. याची पहिली राज्यस्तरीय बैठक नुकतीच पुण्यात पार पडली, याबाबत पुणे प्रतिनिधी उषा पाटिल यांनी पत्रकार परिषदेला माहिती दिली. या परिषदेला पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी स्वाती पवार, अर्चना काकडे, ज्योती सपाटे, मीरा ढोके, संगिता कोरे, सलोनी भोसले, मीना पावडे, शकुंतला भोसले, स्वाती पवार आदी उपस्थित होत्या.
मागण्यांचे ठराव केले पास
उषा पाटील यांनी सांगितले की, पुण्यात पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठराव पास करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सरकारने निश्‍चित तारीख जाहीर करावी. या आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरविणे, मराठा आरक्षण लागू करण्याबाबत शासनाने कालमर्यादा निश्‍चित करणे, सात शासन निर्णयांबाबत जनजागृती करणे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांना शासकीय सवलती लागू कराव्यात, आरक्षण मिळेपर्यंत शैक्षणिक खर्च व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी असणारी फी शंभर टक्के माफ करावी, छत्रपतींच्या स्मारकाची उंची कमी करू नये या मागण्या प्रामु÷ख्याने करण्यात येणार आहेत.