धुळे। प्रत्येक क्षेत्रात महिला चांगल्या पध्दतीने कार्य करीत आहेत. विविध उच्च पदांवर कार्यरत राहून त्या आपल्या कामाचा ठसा उमटवीत आहेत. महिलांवरील अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई आणि इलाज) अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला आयोग गावागावापर्यंत पोचेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी येथे केले.
कार्यशाळेचे उद्घाटन : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, कार्यालय, धुळे यांच्यातर्फे महिलांची कामाच्या ठिकाणावर होणारी लैंगिक छळवणूक अधिनियम 2013 बाबत कल्याण भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे हे या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रा. उषा साळुंखे, अॅड.भावना पिसोळकर, अॅड.अनिता भांबोरे, अॅड. ललिता अडावदकर, मीना भोसले, अॅड.धर्मराज महाजन, अॅड.चंद्रकांत येशीराव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत, श्रीमती नानकर, परीविक्षा अधिकारी एस. डी. परदेशी, ए. व्ही. पाटील, यू. एस. सैंदाणे उपस्थित होत्या.
प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती- जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करीत आहेत. अशा परिस्थितीत समाजाने पारंपरिक मानसिकता बदलणे गरजेचे आहे. जुनाट विचार सोडून दिले पाहिजेत. घराएवढाच वेळ महिलांचा कार्यालयात जातो. त्यामुळे त्यांना तेथेही संरक्षणाची गरज आहे. त्यामुळे या अधिनियमाची निर्मिती झाली आहे. या अधिनियमानुसार प्रत्येक कार्यालयात समितीची स्थापना करण्यात यावी. या समितीकडे महिलांनी अन्याय व अत्याचार झाला असेल, तर तक्रार करावी. या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना महिलांविषयक कायद्यांची सविस्तर माहिती होवू शकेल. महिलांनी आता निर्भय होत निर्भयपूर्ण वातावरणात राहण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कायदा महिलांच्या पाठिशी आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी प्रास्ताविक केले. वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिविक्षा अधिकारी एम. एम. बागूल यांनी आभार मानले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तक्रार करण्यासाठी पुढे यावे
यावेळी ठाकरे म्हणाल्या, महिलांनी अन्याय व अत्याचार सहन करू नये. अन्याय, अत्याचार झाला असेल, तर तक्रार करण्यासाठी पुढे यावे. संबंधित यंत्रणांकडे तक्रारी मांडाव्यात. महिलांच्या पाठिमागे महिला आयोग खंबीरपणे उभे राहील. समाजानेही महिलांच्या मागे उभे राहत त्यांचे मनोधैर्य वाढवावे. महिला आयोगाने विभागवार सुनावणी घेत महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविला आहे. या अधिनियमानुसार प्रत्येक कार्यालयात विशाखा समितींची स्थापना करण्यात यावी, असेही ठाकरे म्हणाल्या.