चिंचवड – मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य आहे. हे शारीरिक आरोग्याहून श्रेष्ठ आहे. महिलांनी आपले मानसिक आरोग्य सांभाळावे, असे आवाहन संमोहनतज्ज्ञ महेश काटे यांनी केले. तसेच त्यांनी मानसिक आरोग्य कसे सांभाळावे याबाबत मार्गदर्शन केले. हिप्नोथेरपी आणि रेमेडी सेंटरमार्फत पिंपळेसौदागर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला आणि मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, आरती चोंधे, सविता खुळे, जयनाथ काटे, संमोहनतज्ञ आरती काटे, सामाजिक कार्यकर्ता चंदा भिसे, विजय धनवटे, पोपट काटे, विकास काटे आदी उपस्थित होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, आजच्या युगात प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात योगदान देत आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि ध्येयाच्या बळावर मोठमोठी शिखरे गाठत आहेत. दुसरीकडे कुटुंबात आई, बहिण, पत्नी, मुलगी, मित्र म्हणूनही सर्व जबाबदार्या चोखपणे पार पाडत आहे. आजच्या स्त्रीने सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात यश संपादित करून सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलता जपण्याचे काम केले आहे.