भुसावळ। भारतीय संस्कृतीच्या खर्या आधारस्तंभ या महिला आहेत. मात्र सध्याच्या युगात महिलांना आपल्या परंपरांचा विसर पडत चालला असून घरातील संस्कृती लोप पावत आहे. त्यामुळे महिलांनी पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकर न करता भारतीय संस्कृतीचे जतन करुन आपल्या पुढील पिढीला देखील सुसंस्कृत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कोळी समाजाच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाली सुर्यवंशी यांनी केले.
सोमेश्वर नगरात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त परिसरातील महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रकाश केर्हाळकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून के. नारखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.सी. वारके, यावल महाविद्यालयाचे एस.टी. कापडे उपस्थित होते. यावेळी परिसरातील महिलांना स्त्री सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल सुर्यवंशी यांनी केले. तर आभार दिलीप चौधरी यांनी मानले.