महिलांनी सक्षम होण्याची आवश्यकता

0

महिला परिषदेत कॅन्टोन्मेंटचे मुख्याधिकारी सानप यांचे प्रतिपादन

देहूरोड : महिलांनी प्रथम सक्षम व्हावे, त्याचबरोबर सुरक्षितता आणि स्वच्छतेला प्राधान्य दिल्यास महिलांबाबतचे असंख्य प्रश्‍न दूर होतील, असे प्रतिपादन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप यांनी येथे व्यक्त केले. येथील साधना सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित महिला परिषदेत ते बोलत होते. साधना सामाजिक संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे, संस्थेच्या संचालिका सविता जाधव, लिलाताई भारद्वाज, सुशीला नरवाल, अ‍ॅड. अशोक रूपवते आदी प्रमुख वक्त्यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

महिला विकास केंद्र स्थापन व्हावे
कॅन्टोन्मेंट भागात महिलांसाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, महिला बचत गटांची नोंदणी करण्यात यावी, महिला विकास केंद्र स्थापन व्हावे, कौटुंबिक समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात यावे, महिला बालकल्याण समिती अंतर्गत वार्षिक बजेटमध्ये 30 टक्के निधी राखीव ठेवण्यात यावा, कॅन्टोन्मेंट हद्दीत सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत 0 ते 14 वयोगटातील मुलींसाठी टपाल खात्यात खाते उघडून त्याचा पहिला हप्ता कॅन्टोन्मेंट बोडारद्वारे भरण्यात यावा, आदी मागण्या यावेळी संस्थेच्या प्रमुख संचालिका सविता जाधव यांनी केल्या.

महिलांसाठी 25 टक्के गाळे राखीव
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने लवकरच शहरात दिडशे कोटींचे विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार असून त्याच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव लवकरच संरक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत शॉपींग मॉलचा समावेश असून भविष्यात या मॉलमध्ये 25 टक्के गाळे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा सानप यांनी यावेळी केली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुनिल म्हस्के यांनी केले.