धुळे। गेल्या 15 दिवसांपासून एकवीरा माता मंदिर परिसर व बापू भंडारी गल्लीत एका मनोविकृताने धुमाकूळ घातला आहे. रात्री घराबाहेर झोपलेल्या महिलांची तो छेडछाड काढीत आहे. विकृत चाळे करणारा हा नराधम चोरी करण्याचाही प्रयत्न करतो. त्याला अनेकांनी बघितले आहे. मात्र, प्रत्येकवेळा तो पळून जाण्यात यशस्वी होत आहे. त्रस्त महिलांनी थेट देवपूर पोलीस ठाणे गाठले. यावेळी महिलांनी आपबिती पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांना सांगितली. त्या विकृताचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी त्यांनी मागणी केली.
विकृताला हुडकून त्याच्यावर कठोर कारवाई करु
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या रात्रीला प्रचंड ऊकाडा होत असल्याने अनेक कुटुंब घराबाहेर झोपतात. हीच संधी साधून एक विकृत 15 दिवसांपासून एकवीरा देवी मंदिराच्या परिसरात भटकून महिलांची छेडखानी काढत आहे. तो केवळ झोपलेल्या महिलांनाच टार्गेट करीत आहे. काही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचाही त्याने प्रयत्न केला आहे. मध्यरात्रीला तो बर्याच नागरिकांना दिसला आहे. मनपा स्थायी सभापती कैलास चौधरींचे बंधू किशोर चौधरी यांनी तीन दिवसांपूर्वी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जुने धुळे भागाकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. हा विकृत कधी काळ्या रंगाचा टीशर्ट व हाप चड्डी घालतो, असेही नागरिकांनी पोलिसांना सांगितले. यावेळी पीआय किशोर शिरसाठ यांनी त्या विकृताला हुडकून त्याच्यावर कठोर कारवाई करु असे आश्वासन महिलांना दिले. निवेदन देतांना नगरसेवक कैलास चौधरी, किशोर चौधरी, अजमशाहा अजरूद्दीन शहा, बीलकीसबी कय्युम शाह, सारिका शांताराम, शेखर रहीम अकबर, नंदा चौधरी, भटाबाई बैसाणे, सुनंदा चौधरी, शांताराम फुलपगारे आदी उपस्थित होते.