महिला आघाडी महानगर संघटकपदाचा राजीनामा

0

वंदना पाटील यांनी प्रकृती अस्वास्थाचे दिले कारण

धुळे । गेल्या २० वर्षांपासून शिवसेना पक्षात एकनिष्ठ, निष्ठावान महिला कार्यकर्त्या म्हणून ज्यांची ओळख असलेल्या वंदना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना महिला आघाडी महानगर संघटकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी संपर्क प्रमुखांना दिलेल्या पत्रात प्रकृती अस्वस्थतेचे कारण सांगितले असून केवळ हेच कारण आहे की आणखी काही या विषयांवर शिवसैनिक, कार्यकर्त्यांमध्ये मात्र कुजबूज सुरु आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहून प्रत्येक कामात हिरीरीने सहभाग नोंदविणार्‍या वंदना पाटील यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला. यापुर्वी एक निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून त्यांची पक्षात ओळख होती. पक्षाने दिलेल्या जबाबदार्‍या त्यांनी वेळोवेळी आक्रमकतेने पार पाडल्या आहेत.

वेळोवेळी आक्रमक घेतल्या भूमिका
नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी त्यांनी प्रशासनाला नेहमीच धारेवर धरले आहे. वेळप्रसंगी धरणे, आंदोलन करून त्यांनी आपली मागणी प्रखरतेने महापालिकेसमोर मांडली आहे. परंतू राजकारणात केव्हा काय घडेल याचा नेम नाही म्हणता त्याप्रमाणे पद सोडण्यामागे नेमके कारण काय या विषयी मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षासाठी प्रकृती अस्वस्थतेमुळे वेळ देऊ शकत नाही असे त्यांनी संपर्क प्रमुखांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे. आगामी काळात त्यांची पुढील वाटचाल काय राहील ते पक्षात राहुन आपले कर्तव्य पार पाडतील की दुसर्‍या पक्षात प्रवेश करतील याकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.