महिला आरक्षणाचा कायदा लवकरच : विजया रहाटकर

0

पुणे । येत्या काळात विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 50 टक्के आरक्षण देणारे विधेयक लवकरच सादर करण्यात येईल. महिलांना आरक्षण लागू करण्याची भाजपची भूमिका असल्याने भाजप सत्तेत असतानाच हा कायदा अस्तित्वात येईल, असा विश्‍वास महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.देशभर तीन तलाकवर सर्वत्र चर्चा सुरू असताना यावर रहाटकर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, तीन तलाक विधेयक संसदेत मंजूर होईल, त्यानंतर मुस्लीम महिलांना भाजप महिला मोर्च्याच्यावतीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात पोलीस तक्रारींपासून न्यायालयीन लढ्यापर्यंत सर्वप्रकारची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रहाटकर म्हणाल्या, राज्यातील 1300 शाळा बंद करण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. ग्रामीण किंवा दुर्गम भागातील शाळा बंद केल्याने मुलींना लांबच्या शाळेत जायला लागू नये. अशी राज्य महिला आयोगाची भूमिका असून त्यामुळे मुलींची गैरसोय होणार नाही. त्यांना गावापासून, घरापासून दूर जावे लागणार नाही. याचा विचार शाळा बंद करताना केला जावा, असेही त्या म्हणाल्या. याच संदर्भात राज्य महिला आयोग फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला अहवाल पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.शाळा दूर असल्यास मुलींवर अत्याचार होण्याची शक्यता जास्त असते. हे कोपर्डी आणि सांगलीतील एका घटनेमुळे पुढे आले असल्याचे रहाटकर यांनी यावेळी सांगितले.