जळगाव : जळगावात गुन्हेगारीने कहर केला असतानाच आता महिला पोलिसही सुरक्षित नाहीत? असे म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिस मुख्यालयाच्या आवारातील पोलिस कवायत मैदानावर पायी फिरत असलेल्या महिला पोलिसाला चाकूचा धाव दाखवत सोन्याची चैन लांबवल्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला पोलिसाला चाकू दाखवून केली लूट
महिला पोलिस कर्मचारी आरती मोतीलाल कुमावत (32) या गुरुवारी रात्री 9.15 च्या सुमारास त्या पोलिस मुख्यालयातील मुख्य परेड ग्राउंडवर पायी फिरत असताना मैदानावर असलेल्या अंधाराचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावली आणि पळून गेला. चोरट्याच्या झटापटीत त्या जखमी देखील झाल्या.
पोलिस अधीक्षकांची धाव
घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.