जळगाव । पुणे येथून जळगावला येत असताना प्रवासादरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक मीना हमजान तडवी यांची पर्स ट्रॅव्हल्समधून चोरट्याने शनिवारी लांबविली. हा प्रकार लक्षात येताच तडवी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोर ट्रॅव्हल्स थांबवून पोलीस स्टेशन गाठले. यानंतर रेमंड चौकात चोरट्याचा पाठलाग करून त्यास पकडण्यात आले. चोरट्यास आज रविवारी न्या. एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अन् पोलिसांना कळविले
पुणे खडका पोलीस स्टेशन उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या व मूळच्या जळगावच्या रहिवासी मीना तडवी या नणंदेच्या लग्नासाठी पुणे येथून ट्रव्हल्सने (क्र.एम.एच.20 डी.0523) जळगावला येत होत्या. ट्रॅव्हल्सने जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात प्रवेश केल्यानंतर तडवी व त्यांचे सहकारी झोपेतून उठले. सामान सोबत घेण्याची तयारी करीत असताना पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. या पर्समध्ये 20 हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल, वाहन परवाना, बॅँकेचे एटीएम व काही रोकड होती. त्यानंतर बस एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर थांबवून त्यांनी पोलिसांना पर्स चोरी झाल्याचे सांगितले.
काही मिनिटात चोरट्यास अटक
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी लागलीच झडती घेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये आल्याचे लक्षात येताच पर्स चोरटा रईस खान लाड साहब (वय-30 रा.बर्हाणपुर) खिडकीतून उडी घेत धूम ठोकली. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून त्याला रेमंड चौकात लागलीच पकडले. त्यानंतर पोलिसांनी खाकी दाखवताच चोरी केल्याची कबूली दिली. यातच त्याच्याकडून पोलिसांना 500 रूपये मिळून आले आहे. रविवारी रईस खान याला न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. चौधरी त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.