महिला, बालकल्याण समिती निघाली ‘केरळ अभ्यासा’ला

0

महिनाअखेर मुदत संपणार असल्याने ठराव

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांची अखेरची बैठक मंगळवारी (दि.3) पार पडली. या सदस्यांची मुदत एप्रिलअखेर संपणार आहे. या अखेरच्या बैठकीत सदस्यांनी केरळचा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. 8 तारखेला हे सदस्य केरळच्या दिशेने ‘टेकऑफ’ करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आणि 11 एप्रिलला शहरात हल्लाबोल आंदोलन आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य दौर्‍यावर जाणार नाहीत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात देखील समितीच्या सात सदस्यांनी सिंगापूर दौरा केला होता.

दौरा आठ दिवसांचा
महिला लघुउद्योजक व्यावसायिक केंद्राची माहिती घेण्यासाठी केरळचा दौरा करण्यात येणार आहे. दौरा आयोजनाचे काम ऑल इंडिया इन्स्टिट्युटला थेट पद्धतीने देण्यास समितीने मंजुरी दिली आहे. याबाबतचा ठराव उपसभापती योगिता नागरगोजे यांनी मांडला होता. त्याला नगरसेविका चंदा लोखंडे यांनी अनुमोदन दिले. महिला व बालकल्याण समितीचे सदस्य केरळ सरकारने महिलांबाबत केलेल्या योजनांची माहिती घेणार आहेत. महिला सक्षमीकरणाबाबत कशापद्धतीने कामकाज केले आहे, याची माहिती या अभ्यास दौर्‍यात घेतली जाणार आहे. हा दौरा आठ दिवसाचा असणार आहे.

राष्ट्रवादीचा नाराजीने नकार
या समितीत नऊ सदस्य आहेत. त्यापैकी सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक असे नऊ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आणि 11 एप्रिलला शहरात हल्लाबोल आंदोलन आहे. त्यामुळे आपण दौ-याला जाणार नसल्याचे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सदस्या सुलक्षणा धर यांनी सांगितले.