नवी दिल्ली । महिला या केवळ बिछान्यात झोपण्यासाठीच योग्य असतात असे वादग्रस्त आणि लज्जास्पद वक्तव्य तेलुगू अभिनेता चलापती राव यांनी केले आहे. महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारे प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चलापती राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेता नागार्जुन यांचा मुलगा चैतन्य याच्या आगामी सिनेमाचा ऑडियो लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अभिनेते रावही उपस्थित होते. ‘महिला मानसिक शांतता भंग करतात’ अशा आशयाचा डायलॉग सिनेमात आहे, याबद्दल चलापती राव यांचेही मत विचारण्यात आले. त्यावेळी आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, ‘महिला मानसिक शांतता भंग करत नाहीत तर त्या बिछान्यात झोपण्यासाठी चांगल्या असतात.’ चलापती राव यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला. महिलांचा अपमान करणार्या राव यांना चोपून काढा तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अनेक महिला संघटनांनी करत तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी सरुनगर पोलिस स्थानकात 354 अ आणि 509 कलमांंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राव यांच्या वक्तव्यानंतर अभिनेता नागार्जुन यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, ‘मी वैयक्तिकरीत्या महिलांचा आदर करतो आणि चलापति राव यांच्या अपमानजनक वक्तव्याशी सहमत नाही’ असे ट्विट त्यांनी केले आहे. चलापती राव हे गेल्या चार दशकांपासून तेलुगू सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहेत. त्यांनी केलेल्या अभिनयामुळे ते खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी आपली एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे.