आकुर्डीच्या उर्मिला काळभोर यांची नियुक्ती
मावळ जिल्हा संघटकपदी शादान चौधरी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या, भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा आमदारकी लढलेल्या आणि तीन टर्म नगरसेविका राहिलेल्या सुलभा उबाळे यांची शहर शिवसेनेच्या महिला संघटकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आकुर्डीच्या अॅड. उर्मिला काळभोर यांची नियुक्ती केली आहे. तसेच मावळ जिल्हा संघटकपदी शादान चौधरी यांना दिले आहे. या दोघीही खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थक आहेत. पदावरून काढून घेतल्याने उबाळे यांची भूमिका काय असेल, यावरून चर्चा रंगली आहे.
उबाळे आक्रमक चेहरा
हे देखील वाचा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पिंपरी-चिंचवडच्या संघटनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सर्वात आधी संपर्कप्रमुख अमोल कोल्हे यांना काढून खासदार संजय राऊत यांच्याकडे पिंपरी-चिंचवडची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर शहरप्रमुख राहुल कलाटे यांना केवळ महापालिकेतील गटनेतपदावर ठेवले. त्यांच्या जागी योगेश बाबर यांची निवड केली. आता उबाळे हटविले आहे. आक्रमक आणि भाषण कौशल्य असणार्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या त्यांच्यासारखा आक्रमक चेहरा सेनेत नाही. त्यामुळेच त्यांची झालेली उचलबांगडी अनेकांना राजकीय धक्का देणारी आहे. त्यांनी सलग दोनवेळा भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर त्यांच्याकडे शहर महिला संघटकपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, आता या पदावरूनही त्यांची उचलबांगडी झाली आहे.
खासदार बारणे समर्थकांच्या निवडी
शहर शिवसेनेच्या महिला संघटकपदी अॅड. उर्मिला काळभोर यांची नियुक्ती, तर, पिंपरी विधानसभा संघटकपदी सरिता साने आणि चिंचवड विधानसभा संघटकपदी अनिता तुतारे यांची निवड केली आहे. काळभोर या मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थक आहेत. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी शिवसेनेकडून काळभोरनगर प्रभागातून पालिकेची निवडणूक लढविली होती. परंतु, थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. याशिवाय जिल्हा संघटकपदी शादान चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मावळ, पिंपरी आणि चिंचवडची जबाबदारी असणार आहे. चौधरी या लोणावळा नगरपरिषदेत विरोधी पक्षनेत्या आहेत. खासदार बारणे यांच्या त्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात.
निवडणुकीची तयारी
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी योगेश बाबर, जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे या आपल्या समर्थकांची वर्णी लावल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी आता महिला आघाडीच्या शहर आणि जिल्हा संघटकपदी आपल्या समर्थकांची वर्णी लावून घेतली आहे. बारणे यांनी मावळचा गड राखण्याची जोरदार तयारी सुरू केली असून पक्ष संघटना मजबूत करण्यावर जोर दिला आहे.