महिला सक्षमीकरणात प्रतिष्ठा महिला मंडळाचा सिंहाचा वाटा

0

खासदार रक्षा खडसे ; भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उद्योजक मेळाव्याचे उद्घाटन

भुसावळ- चूल आणि मुलं या संकल्पनेपुरताच आता महिलांचे काम मर्यादीत राहिलेले नाही तर महिला आता खर्‍या अर्थाने सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. भुसावळसह तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्धतेसोबत त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यात प्रतिष्ठा महिला मंडळाचा वाटा सिंहाचा असून या मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांचे कार्य खरोखरच कौस्तुकास्पद असल्याची भावना खासदार रक्षा खडसे यांनी येथे व्यक्त केली. शहरातील ब्राह्मण संघात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या चार दिवसीय उद्योजक मेळाव्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

लोकप्रतिनिधींची जवाबदारी वाढली
खासदार खडसे म्हणाल्या की, जे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे ते काम आता प्रतिष्ठा मंडळाने केले आहे. महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या वस्तू विक्रीसाठी मेळावा भरवणे ही संकल्पना अतिशय छान आहे. आजकाल हाताने बनवलेल्या वस्तूंचे मार्केट तेजीत आहे. महिला स्वबळावर दोन पैसे कमवत असल्याची बाब गौरवास्पद आहे. या माध्यमातून त्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात भुसावळात बहिणाबाई महोत्सव भरवण्यात येईल व या माध्यमातून किमान चारशे स्टॉल महिलांना उपलब्ध करू, असेही त्या म्हणाल्या.

दुसर्‍याला आनंद देणे हीच खरी दिवाळी -आमदार संजय सावकारे
कुठलेही मंडळ चालवण्यासाठी संघटन आवश्यक आहे, सर्वांच्या सहकार्याने प्रतिष्ठा महिला मंडळाची वाटचाल सुरू आहे. कुणाच्या तरी घरी दोन पैसे जातात, त्यांची दिवाळी साजरी होवून आनंद मिळतो आमच्यासाठी हेच समाधान आहे. दुसर्‍याला आनंद देणे हीच खरी आमच्यासाठी दिवाळी असल्याचे सूचक वक्तव्य आमदार संजय सावकारे यांनी मनोगतात व्यक्त केले. सावकारे म्हणाले की, प्रतिष्ठा मंडळाला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असून सुरूवातीला महिलांना घरगुती वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व या वस्तू बनवल्यानंतर त्या विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध करून देण्यात आले. प्रत्येकाने पत्नीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास महिला निश्‍चित सक्षम होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नगरसेविका सोनल महाजन, मेघा वाणी, नगरसेवक किरण कोलते, रावेर पंचायत समिती सदस्य वानखेडे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिकेत पाटील, सामाजिक कार्यकर्ते देवा वाणी, हिमांशु दुसाने आदींची उपस्थिती होती.

काय-काय आहेत उद्योजक मेळाव्यात !
दिवाळीचे फराळ, दिवाळी डेकोरेशन, आकर्षक दिवे, ज्वेलरी, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, सौंदर्य प्रसाधने, वेगवेगळे गिफ्ट्स आयटम, साड्या, रेडीमेड कपडे, ड्रेस मटेरीयल आदी वस्तू उद्योजक मेळाव्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत शिवाय खान्देशातील लज्जतदार पदार्थांची येथे रेलचेल आहे शिवाय दररोज मेनू नास्त्यासाठी उपलब्ध असल्याने खवैय्यांकडून या पदार्थांना चांगली मागणीही आहे.

यांनी घेतले परीश्रम
सूत्रसंचालन सुनंदा भारूडे व अलका भटकर व आभार मंडळाचा सदस्या लता सोनवणे, अनिता आंबेकर यांनी मानले. यशस्वितेसाठी उपाध्यक्ष सुनंदा भारूडे, सचिव लता सोनवणे, अलका भटकर, मनीषा काकडे, सरला सावकारे, अर्चना सोनवणे, सारीका यादव, अनिता आंबेकर यांच्यासह नारायण कोळी, रवींद्र पाटील, दिनेश चांदणे, दीपक बाविस्कर यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, 2 नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या उद्योजक मेळाव्यास शहरवासीयांनी एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केले आहे.