महिला सरपंचांनी अधिकारांचा वापर करावा-विजया रहाटकर

0

 ’कायदे व रोजगार’ विषयावर मार्गदर्शन

पुणे । जिल्ह्यातील अनेक गावांचा कारभार महिला सरपंच हाकत आहेत. मात्र, आजही काही महिलांना स्वत:च्या अधिकाराची ताकद लक्षात येत नाही. त्यामुळे महिलांनी स्वत:चे अधिकार जाणून घेऊन, अभ्यासपूर्ण पद्धतीने आपल्या अधिकाराचा वापर करत गावाचा विकास करावा, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.

राज्य महिला आयोगातच्या वतीने जिल्ह्यातील महिला सरपंचांचे ’कायदे व रोजगार’ विषयावर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी रहाटकर यांनी शिबिरातील उपस्थित महिला सरपंचांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज माढरे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते.

कायद्यांचे ज्ञान हवे

मी माझ्या कामावर निवडून आले आहे. अभ्यासपुर्ण पद्धतीने आणि पूर्ण क्षमतेने काम करत राहिल्याने अनेक नेत्यांना मी निवडणुकीत पराभूत केले. त्यामुळे महिला सरपंचांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. आपल्या क्षमेतवर विश्‍वास ठेवून काम करताना, महिला सरपंचांना कायद्यांचे ज्ञान हवे. महिलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी असणारे कायदे तसेच दैनंदिन कामकाजातच उपयोगी पडणारे कायदे या सर्व कायद्यांची माहिती महिला सरपंचांना हवी, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.

महिला सरपंचाच्या नावाखाली पतीचा पुढाकार

जिल्हा परिषदेत अनेकवेळा मला भेटण्यासाठी महिला सरपंचाच्या नावाखाली त्यांचे पती येतात. त्यावेळी माझ्या पत्नी या महिला सरपंच आहे, असे सांगून गावची समस्या किंवा काही कामे सांगतात. मात्र, महिला सरपंचांना पुढे येऊ देत नाही. त्यामुळे मी सवतःहूनच महिला सरपंचांना समस्या मांडण्याबाबत सांगतो. त्यांना संधी मिळाली की ते उत्तम काम करतात, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशिष जराड यांनी तर आभार दीपक चाटे यांनी मानले.