महिलेचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

0

मुंढवा । प्रियकराने प्रेयसीला अंधारात ठेवून परस्पर दुसर्‍या मुलीसोबत विवाह केल्याने प्रेयसीने भर रस्त्यात पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना केशवनगर येथे 12 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रियकरासह चौघांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर कुष्णदेव माने (रा. केशवनगर, मुंढवा), त्याचे आई-वडिल आणि वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याप्रकरणी एका 33 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला 45 टक्के भाजली आहे. यातील फिर्यादी महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करते तर, आरोपी सागर माने याचा टँकरचा व्यवसाय आहे. या दोघांची दोन वर्षांपासून ओळख आहे. फिर्यादी महिलेला सागर बरोबर विवाह करायचा होता. मात्र, त्याने तिला विवाहास नकार दिला होता. यानंतर त्याने फिर्यादीस न सांगता परस्पर दुसर्‍या मुलीसोबत विवाह केला. घटनेच्या दिवशी फिर्यादी महिला सागरला भेटायला आली होती. यावेळी त्याच्या घरच्यांशी तिला सागर याचा विवाह झाला आहे, तु सुध्दा लग्न कर, आमच्या मुलाचे वाटोळे करू नकोस, झाले गेले विसरून जा असे म्हटले.

तसेच तिला शिवीगाळ करून, हाताने मारहाण करत अशोभनीय वर्तन केले. या सर्व गोष्टींमुळे फिर्यादी महिलेने भर रस्त्यात अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी आरोपी सागर माने, त्याचे आई-वडिल आणि चालक घटनास्थळी होते. यानंतर त्यांनी फिर्यादी महिलेला रुग्णालयाचा सर्व खर्च करतो असे सांगुन ससून रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे दाखल केल्यानंतर सर्वजण तिला एकटीला सोडून निघून गेले. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून सागर माने याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए.जी. गवळी करत आहेत.