जळगाव: शहरातील तांबापुरा मच्छीबाजार भागात महिलेला धक्का मारल्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणमारी होवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोन्ही गटातील ४८ संशयितांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे. यातील १८ संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
तांबापुरामध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी अशोक उर्फ विक्की हटकर, मोहम्मद शेख अब्दुल, जमिल खान अब्बास खान, शेख फयाज शेख समसुद, रिजवान शेख युनुस, किरण रमेश तोतरे, इमरान शेख हरुन, शेख हरुन शेख हुसेन, शेख अशपाक शेख मुस्तफा, शेख रोशन शेख उस्मान, शफिक अहमद अब्दुल रहेमान, बबलु शेख उस्मान, रविंद्र अर्जून हटकर, किशोर भागवत हटकर, सुरेश भिका हटकर, विलास नथ्थू हटकर, हनीफ उर्फ हमीद लतीफ खाटीक, सब्बांनी मोहम्मद अन्सारी, इम्रान कुरेशी रा. सर्व मच्छीबाजार, गवळीवाडा या १९ जणांना अटक केली होती. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची आज मुदत संपल्याने त्यांना न्या. सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्व संशयितांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सरकाररपक्षातर्फे ऍड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले.
दंगलीतील संशयित सुभाष विसे यांची प्रकृती खराब असल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. या संशयिताच्या कोठडीबाबत न्यायालयाने व्हीसी घेतली. यावेळी संशयिताला दोन दिवसानंतर न्यायालयात हजर करावे असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.