महिलेला मारहाण करून मंगळसूत्र चोरले

0

भोसरी : दिघीमध्ये राहणार्‍या एका महिलेच्या घरात घुसून जबरमारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारुन नेल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनउच्या सुमारास घडली. याप्रकरणी 36 वर्षीय पिडित महिलेने विजय भगवान शिंदे (वय 27) व एका अज्ञात महिला (दोघे ही रा. आळंदी) यांच्या विरुध्द दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत 36 वर्षीय महिला या दिघीमध्ये राहतात. मंगळवारी रात्री साडेनउच्या सुमारास त्या आपल्या राहत्या घरी एकट्याच होत्या. इतक्यात आरोपी महिला व विजय शिंदे नामक तरुण त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी पिडीत महिलेला तुझे पती कुठे आहेत, आमचे त्यांच्याकडे दोन लाख रुपये आहेत, असे बोलून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी पिडीत महिलेचा पती व मुलगा त्यांना वाचवण्यासाठी आले. मात्र त्यांनाही आरोपींनी हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपींचा प्रतिकार करत असताना आरोपींनी पिडित महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरुन नेले.