महेश मंडळला रक्तमित्र पुरस्कार प्रदान

0

रोहीणी जाधव ट्रस्टच्यावतीने सामाजिक पुरस्काराचे वितरण

नवी सांगवी : सामाजिक कार्य करीत असताना कोणाचेही मन दुखवणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यानुसार आपले कर्म असावे. प्रत्येक माणसाने समाजाप्रती आपले कर्तव्य ओळखून काही ना काही काम समाजासाठी केली पाहिजे. आपल्या समाजाचे आपण काही देणे लागत असतो. त्यासाठी आपण काम केले पाहिजे. पुरस्काराचे मानकरी असलेले हे लोक अशाच ध्येयाने वेडे झालेले आहेत. त्या कामाचे कौतुक म्हणून हे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत, असे उद्गार आमदार राहुल कुल यांनी काढले. दौंड येथे स्व. रोहीणी जाधव ट्रस्टच्यावतीने पुरस्कार आमदार कुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. असीम सरोदे, प्रेमसुख कटारिया, ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र जाधव उपस्थित होते.

विविध सामाजिक पुरस्कार
स्व. रोहिणी जाधव ट्रस्टच्यावतीने दरवर्षी राज्य पातळीवरील विविध सामाजिक पुरस्कार प्रदान केले जातात. रक्तदाते अथवा रक्त मिळवून मदत करणारे, तसेच रक्तदान शिबीर घेवून रक्त उपलब्ध करून देणार्‍या कार्यकर्त्यास ‘रक्तमित्र पुरस्कार’ प्रदान केला जातो. यावर्षी सांगवी परीसर महेश मंडळचे अध्यक्ष सत्यनरायण लोहीया यांना देण्यात आला. गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त वेळा रक्तदान केल्याबद्दल राज्यस्तरीय ‘रक्तदाता पुरस्कार’ जळगाव येथील राजेश यावलकर यांना बहाल करण्यात आला. एडस् जनजागृती पुरस्कार मिरज येथील अनिल शामराव वळीव यांना देण्यात आला. नंदुरबार जिल्हयातील तळोदे येथील विठ्ठल चंदु मगरे यांना निसर्ग पर्यावरण मित्र हा पुरस्कार देण्यात आला.

सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे
अ‍ॅड. असिम सरोदे म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार नैसर्गिक संपत्तीचा नाश करीत आहेत. मिडीया त्याला खतपणी घालत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मिडिया सकारात्मक भूमिका बजावत नाही. कोणताही प्रश्‍न सुटण्यापेक्षा तो अधिक जटील कसा होईल याकडे त्यांचे लक्ष असते. देशाची लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांनी निष्ठेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.