पुणे । मांगूर माशांची मत्स्यशेती करण्यास केंद्र व राज्य शासनाची परवानगी नसताना डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे मांगूर जातीच्या माशांचे संवर्धन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. डिंग्रजवाडीला बेकायदा चालू असलेल्या मांगूर माशांच्या व्यवसायात खाण्यासाठी कोंबड्यांची घाण, खाण्याजोगे नसलेले चिकन तळ्यात आणून टाकले जात असल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. संबंधित अधिकार्यांनी याठिकाणची पाहणी केली.
सहायक आयुक्तांकडून पाहणी
याठिकाणी चिकन खाण्यासाठी मोठ-मोठ्या घारी फिरत असल्याने व हे क्षेत्र विमानकक्षेच्या दुसर्या पट्ट्यात येत असल्याने विमानासही धोका संभवू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. तेजस यादव यांनी पुणे येथील मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जनक भोसले यांनी डिंग्रजवाडी येथे सुरू असलेल्या मत्स्य शेतीस 14 एप्रिल रोजी भेट देत पाहणी केली. त्यावेळी अनधिकृतपणे संवर्धन करत असल्याचे आढळून आले.
नोटीस देऊनही उत्पादन सुरूच
त्यांनतर सदर विकास अधिकारी यांनी मत्स्यव्यवसाय करणार्या लोकांना तुम्हाला या माशांचे संवर्धन करता येणार नाही, तरीदेखील पंधरा एप्रिल 2018 रोजी लेखी नोटीस देत आठ दिवसांमध्ये प्रकल्प पूर्णपणे बंद करून मत्स्यसाठा पूर्णपणे नष्ट करावा, असे लेखी आदेश दिले होते. त्यांनतरदेखील या व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारे हा व्यवसाय बंद न करता बेकायदेशीरपणे मांगूर माशांचे संवर्धन सुरूच ठेवले. फिर्याद दाखल झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी डिंग्रजवाडीतील तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करत आहे.