मांडूळ सापाची तस्करी ; संयुक्त कारवाईत एकाला अटक

0

यावल- तालुक्यातील चिंचोली गावाजवळ मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी करण्याच्या बेतात असलेल्या दोघांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. वनविभागाच्या प्रादेशिक व गस्ती पथकाने संयुक्तरीत्या गुरूवारी सकाळी ही कारवाई केली. मात्र, मुख्य संशयीत मात्र फरार झाला आहे. यावल प्रादेशिक वनविभाग पश्चिमचे वनक्षेत्रपाल विशाल कुटे व गस्तीपथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील यांना तालुक्यात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. दोन्ही विभागाच्या वतीने वनपाल एस. आय.पिंजारी, वनरक्षक आय.बी. मोरे, राकेश निकुंभे, गस्तीपथकचे संदीप पंडीत, किरण पवार, भरत बाविस्कर, हवालदार सचिन तडवी आदी कर्मचार्‍याचे पथक तयार करण्यात आले व तालुक्यातील चिंचोली जवळील पेट्रोल पंपच्या पुढे एका झोपडीत या पथकाने छापा टाकला. तेथे अशोक गंगाराम धीवर (34, रा. पथराळे, ता.यावल) व शंकर समाधान शिंदे यांना ताब्यात घेतले व झोपडीची झडती घेतली असता जुन्या तुपाच्या बरणीत माती टाकून त्यात मांडूळ जातीचे साप लपवून तस्करीच्या हेतूने ठेवले होते. तेव्हा संशयावरून दोघांना मांडूळासह ताब्यात घेण्यात आले तर या तस्करीतील मुख्य सुत्रधार म्हणून संशयीत समाधान डिगंबर धनगर (रा. चिंचोली) हा मात्र पसार झाला आहे तर चौकशीअंती शंकर समाधान शिंदे याचा या तस्करीशी संबध नसल्याचे आढळून आल्याने त्यास चौकशी करून सोडण्यात आले. वन्यजीव तस्करी कलमासह विविध कलमानुसार संशयीत धीवर यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.