पुणे । ‘माऊली… माऊली… आणि गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. दुसर्या वर्षी प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करून गणरायाला वंदन केले. यावेळी अश्वांचे पूजन करण्यात आले.
बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन झाले. यावेळी सुनील रासने, महेश सुर्यवंशी, उर्जीत सिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), अंकलीकर (बेळगाव), राजाभाऊ थोरात, मारुती कोकाटे, बाळासाहेब वांजळे, अरुण देशमाने यांसह वारकरीमंडळी उपस्थित होती. शितोळे सरकार म्हणाले, दरवर्षी 300 किमी पायी प्रवास करून हे अश्व वारीला जातात. अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे.