माऊलींच्या पालखी रथासाठी ‘सर्जा-राजा’

0

मानाची बैलजोडी अलंकापुरीत दाखल

आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज पायी वारी आषाढी यात्रा पालखी सोहळ्यासाठी श्रींचा पालखी रथ ओढण्यासाठी मानाची ‘सर्जा-राजा’ बैलजोडी अलंकापुरीत दाखल झाली आहे. शेतकरी रामकृष्ण घुंडरे पाटील यांच्या बैलजोडीस हा मान मिळाला आहे. सर्जा-राजाची बैलजोडी आळंदीत आल्याने श्रींचे पालखी रथाची बैलजोडी पाहण्यास भाविक गर्दी करीत आहेत. बैल समितीने येथील शेतकरी घुंडरे यांना यावर्षीची सेवा देण्याचा निर्णय घेतला. या सेवेसाठी 8 अर्ज दाखल झाले होते. रथाला बैलजोडी देण्यासाठी घुंडरे पाटील यांना संधी देण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी राज्यासह राज्याबाहेर फिरून बैल जोडी खरेदी केली. राज्यातून वाई, बावधन या गावातून प्रत्येकी एक एक बैल घेत जोडी खरेदी केली. बैल जोडी पांढरी शुभ्र, वशिंड लक्षवेधी, शिंगाने अधिक भारदस्त आहे.

सेवा करण्याचा आनंद
माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, ज्ञानेश्‍वर घुंडरे, रामकृष्ण घुंडरे, सचिन घुंडरे आणि घुंडरे परिवाराने सांगितले की, यावर्षी श्रींच्या सेवेची संधी मिळाल्याने आनंद झाला आहे. सर्जा-राजाची सेवा, खुराक, पशुवैद्यकीय तपासणी नियमित केली जाणार आहे. तसेच सर्जा-राजा शिवाय अजून एक बैलजोडी पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवली आहे. सर्जा-राजाच्या लक्षवेधी जोडीने माऊलींचे वैभवी पालखी सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत. त्यांच्यामुळे पालखी सोहळ्याची शान वाढेल हे नक्की.