पुणे । राज्याच्या विविध भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणार्या मागासवर्गीय विद्यार्थिनी व महिलांसाठी महापालिकेतर्फे अद्ययावत वसतिगृह सुरू करण्यास गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या वसतिगृहाला समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी स्थापन केलेल्या शाळेतील प्रथम विद्यार्थिनी मुक्ताताई साळवे यांचे नाव देण्याचे देखील निश्चित करण्यात आले.
याबाबतचा प्रस्ताव काँग्रेसचे अविनाश बागवे आणि राष्ट्रवादीच्या प्रिया गदादे यांनी मांडला होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुसज्ज वसतिगृह उभारण्यात आले आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा उपयोग होत आहे. त्याच धर्तीवर राज्यातून शिक्षणाकरिता आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थिनी व महिलांसाठी सुसज्जवसतिगृह सुरू करण्यात यावे. शाळेतील पहिल्या विद्यार्थिनी मुक्ताताई साळवे यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या मौलिक कामगिरीच्या गौरवार्थ त्यांचे नाव देण्यात यावे. निधीची कमतरता भासल्यास मागासवर्गीय कल्याणकारी निधीतून या वसतिगृहाचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.