पुणे:- पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी जगताने डोके वर काढले आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून रोज छोट्या मोठ्या घटना घडत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटी भागात दारु पित बसलेल्या तरुणांना जाब विचारणाऱ्या दोघा व्यक्तींवर पहिले हल्ला करण्यात आला. याच परिसरात राहत असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जाऊन काय झालं म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांच्यावरही दारु पिणाऱ्या तरुणांनी हल्ला केला.
या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला व बोटांना दुखापत झालेली आहे. याप्रकरणी कुलकर्णी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आहे. चार जणांना ताब्यात घेतले आहे.
कोथरुड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दारुड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. पोलीस याकडे दुर्लक्ष करत असून या भागात गस्त वाढवण्याची मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली. २०१९ विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून पक्षाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. चंद्रकांत पाटील सध्या कोथरुडचे आमदार आहेत.