माजी आमदार संतोष चौधरींसह तिघे निर्दोष

0

भुसावळ । पूरग्रस्तांची बिले मंजूर का करीत नाहीत? असा जाब विचारत भुसावळ तहसील कार्यालयात गोंधळ घालून लिपिकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरींसह माजी नगरसेवक जलील कुरेशी, साबीर शेख यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 11 वर्षांनी न्यायालयाचा निकाल लागला असून तिघांना संशयाचा फायदा देत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

लिपिकाला मारहाण करीत विचारला होता जाब
28 सप्टेंबर 2006 रोजी त्यावेळी आमदार असलेल्या संतोष चौधरींसह जलील कुरेशी, साबीर शेख यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात प्रवेश करीत तत्कालीन तहसीलदार दराडे यांना पूरग्रस्तांची बिले का मंजूर करीत नाहीत, असे म्हणत जाब विचारला होता तर लिपिक ज्ञानेश्‍वर नाफडे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी बिलांबालत वरिष्ठांना विचारा, असे सांगितल्याने त्यांना मारहाण झाली होती तसेच तहसीलदारांच्या दालनातील काचही फोडण्यात आले होते. शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा व शासकीय कर्मचार्‍याला मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयाचा फायदा ; 11 वर्षांनी दिलासा
भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात न्या.पी.ए.पाटील यांच्या न्यायासनासमोर खटल्याचे कामकाज चालले. सात साक्षीदार तपासण्यात आले. संशयीत आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आले. सरकारतर्फे अ‍ॅड.नवाब अहमद तर आरोपीतर्फे अ‍ॅड.जगदीश कापडे व अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी युक्तीवाद केला.