भुसावळ : गाळे खरेदी करून देण्याच्या आमिषाने 60 लाख 70 हजारांची रक्कम घेवूनही गाळ्यांची खरेदी करून न दिल्याप्रकरणी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात 23 जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी चौधरी यांनी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला मात्र दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या.एस.बी.भन्साली यांनी तो गुरुवारी फेटाळला. दरम्यान, अटकपूर्व फेटाळल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी हालचाली गतिमान करताच चौधरी न्यायालयाबाहेर पडले तर चौधरींच्या घरीही पोलिसांनी धाव घेतली मात्र ते आढळले नाहीत.
महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल
बाजारपेठ पोलिसात यासंदर्भात ममता सुधाकर सनांसे (36, पूजा कॉम्प्लेक्स, सतगुरू हौसिंग सोसायटी, भुसावळ) यांनी 23 जानेवारी रोजी रात्री तक्रार दिली होती. संशयीत आरोपी अनिल चौधरी (न्यू एरीया प्लॉट, भुसावळ) यांनी 19 ऑक्टोबर 2019 ते आजपर्यंत भुसावळातील जामनेर रोडवरील नवशक्ती आर्केडमधील जी- 14 ते 17 व 19 क्रमांकाचा गाळा खरेदी करून देण्याच्या बहाण्याने 60 लाख 70 हजारांची रक्कम आयडीबीआय बँक व भुसावळातील दुय्यम निबंधक कार्यालयात स्वीकारूनही गाळ्यांची अद्याप खरेदी करून दिली नाही. यासंदर्भात विचारणा केली असता तक्रारदार ममता सनांसे व त्यांचे पती सुधाकर सुनांसे यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच ‘तुमच्याने जे होईल ते करून घ्या’, अशी धमकी दिल्याचा आरोपही महिलेने तक्रारीत केला होता.
चौधरींना दिलासा नाही : अटकपूर्व फेटाळला
या गुन्ह्यात अटक न होण्यासाठी चौधरी यांनी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज टाकला मात्र सरकार पक्ष व पोलिसांनी मांडलेल्या बाजूनंतर तो गुरुवारी फेटाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक कृष्णा भोये करीत आहेत.