रावेर लोकसभा निवडणुकीचा आढावा ; दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
भुसावळ- प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या 15 दिवसांपासून मुंबईत उपचार घेत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दुरांतो एक्स्प्रेसने भुसावळात आगमन झाले. याप्रसंगी रावेर लोकसभेसह भुसावळ शहर व ग्रामीणच्या असंख्य कार्यकर्त्यांनी खडसे यांचे स्वागत केले. याप्रसंगी खडसे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करीत निवडणुकीबाबत नियोजनाची माहिती जाणून घेतली. पहाटेच खडसे मुक्ताईनगरात रवाना झाले. सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी योग, प्राणायाम करीत सात वाजता कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर दिवसभर भुसावळसह रावेर लोकसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच भेट घेतली. याप्रसंगी खडसे यांनी रावेर लोकसभेचा आढावा घेत उणीवाही जाणून घेत संबंधिताना त्याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या हालचाली, नियोजन याबाबतही माहिती जाणली. भाजपाचे संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्याशी त्यांनी रावेर लोकसभा निवडणुकीबाबत अनेक मुद्यांवर चर्चा केली. रविवारपासून खडसे मतदारसंघात पुन्हा प्रचारासाठी तोच उत्साह घेवून सक्रिय होणार आहेत.