रस्ता चौपदरीकरणासंदर्भात माहिती मिळण्यासाठी भुसावळ प्रांताधिकार्यांना अर्ज
भुसावळ- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपा पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी रावेर न्यायालयात हजेरी लावत या खटल्याबाबत याचिकेसंदर्भात निर्णय लागत नाही तोपर्यंत कायमस्वरुपी सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्यासाठी परवानगी मिळावी या आशयाचा अर्ज न्यायालयात दिला. न्या.आर.एल.राठोड यांनी पुढील सुनावणीकरीता 5 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. दरम्यान, दमानिया यांनी रावेरनंतर भुसावळ प्रांताधिकारी कार्यालय गाठत प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना अर्जाद्वारे महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात माहितीसंदर्भात लेखी अर्ज दिला आहे.
रावेर न्यायालयात हजेरी
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपाचीही बदनामी केल्याप्रकरणी दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयात 28 जून 2016 रोजी भादंवि कलम 499 व 500 अन्वये फौजदारी खटला (क्र.400/16) फौजदारी खटला दाखल असून या खटल्यात सुनावणीकामी अंजली दमानिया गुरूवारी दुपारी रावेर न्यायालयात त्यांचे वकील अॅड.सुधीर कुलकर्णी यांच्यासह उपस्थित झाल्य. नियमित न्यायासनावरील न्या.अनुप जयस्वाल रजेवर असल्याने सहदिवाणी न्या.आर.एल.राठोड यांच्या न्यायासनासमोर फिर्यादी सुनील पाटील, त्यांचे वकील अॅड.चंद्रजीत पाटील, अॅड.तुषार माळी व आरोपी अंजली दमानिया व त्यांचे वकील अॅड.सुधीर कुलकर्णी यांचा पुकारा करण्यात आला. यावेळी फिर्यादी पक्ष अनुपस्थित होता अंजली दमानिया यांनी राज्यात खडसे व भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी राज्यात दाखल झालेली 28 दाव्यांचे एकत्रीकरण करून त्यांची एकाच ठिकाणी सुनावणी घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर पुढील निर्णय होईपर्यंत सदरील दाव्याच्या सुनावणीसाठी कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मुभा मिळावी, असा विनंती अर्ज न्यायासनासमोर दिला. मात्र सदरील दावा नियमित सुरू असलेल्या न्यायासनासमोरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असा निर्णय न्या.राठोड यांनी देत 5 ऑक्टोबर ही सुनावणीची तारीख दिली.
भुसावळात मागितली भूसंपादनाची माहिती
भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात दमानिया वकील व सहकार्यांसह तीन वाजता दाखल झाल्या. साकेगाव ते चिखलीदरम्यान रस्ता चौपदरीकरणांतर्गत भू-संपादन करण्यात आले असून त्याची माहिती दमानियांनी नक्कल अर्जाद्वारे विचारली. दरम्यान, दमानियांना या संदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही मात्र योग्य वेळ आल्यानंतरच त्यावर भाष्य करू, असेही त्यांनी सांगत सर्व दावे लढण्यासाठी आपण आता सक्षम असल्याचे सांगितले.