मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी सोमवारी अखेर पक्षाला रामराम ठोकत विनायक मेटे यांनी नुकत्याच स्थापन केलेल्या भारतीय संग्राम परिषद, या पक्षात प्रवेश केला. काँग्रेस दिशाहीन झालेला पक्ष झाला आहे. पक्षाची लहान-मोठी जबाबदारी द्यावी याकरिता पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. मात्र त्यांनी कोणतीच जबाबदारी न दिल्याने आपली घूसमट होत होती. यामुळे आपण भारतीय संग्राम परिषदेत प्रवेश करत असल्याची घोषणा सुबोध मोहिते यांनी मेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
शिवसंग्राम संघटना सक्रीय राजकारणात निवडणुका लढवित नव्हता. शिवसंग्रामचे काम संघटनात्मक पातळीवर केले जात होते. शिवसंग्राम संघटनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे यासाठी जनमानसातूनच रेटा येत असल्याने भारतीय संग्राम परिषद या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी यावेळी दिली.
भारतीय जनता पार्टीकडून मित्रपक्षांची फसवणूक करण्यात येत आहे. भाजपा सत्तेत असूनही निर्णय प्रक्रियेत महाआघाडीतील घटक पक्षांना सामावून घेत नाही. भाजपाने मंत्री बनविण्याचे आश्वासन अजूनही ते पाळले नाही. त्यामुळे भाजपावर आम्ही नाराज आहोत. मात्र, त्यांच्यासोबत आम्ही यापुढेही कायम राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीयदृष्ट्या आम्ही लहान असलो तरी आता आम्हाला मोठे व्हायचे आहे. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी करून त्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सुबोध मोहिते यांचा अनुभव पाहता त्यांना भारतीय संग्राम परिषद, या राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
वाढीव खर्चाच्या निविदा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी आतापर्यंत रिलायन्स, एल अँण्ड टी आणि शापूरजी पालनजी या तिघांनी निविदा सादर केली होती. मात्र यातून रिलायन्स कंपनीने माघार घेतली आहे. उरलेल्या दोन्ही निविदा या नियोजित खर्चापेक्षा (२३०० कोटी) जास्त दराच्या आहेत. या कंपन्यांनी खर्च कमी करण्याची तयारी दाखविली तर यापैकी एका कंपनीला काम दिले जाईल. अन्यथा राज्य सरकारकडून पुन्हा नव्याने निविदा मागवाव्या लागतील, अशी माहितीही शिवस्मारक समितीचे अध्यक्ष या नात्याने विनायक मेटे यांनी दिली.