नाडगावात विकासकामांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ; शिवसेनेचा आरोप
भुसावळ- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे माहेर असलेल्या बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विकासकामे ठप्प झाल्याने गावात अनेक मूलभूत सुविधांची वाणवा निर्माण झाली असल्याचा आरोप शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. बोदवड तालुक्यातील नाडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे विकासकामांना गती दिली जात नसल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गावातील ऐतिहासीक पायविहिर, स्मशानभुमीचा मुद्दा, गावातील अस्वच्छता, गटारींची झालेली दुरवस्था, सार्वजनिक पथदिवे, नादुरूस्त झालेले हातपंप यामुळे निर्माण होत असलेली पाण्याची समस्या अशा अनेक मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
माजी राष्ट्रपतींच्या माहेरांत सुविधांचा अभाव
नाडगाव हे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे माहेर असूनही या गावातील नागरीकांच्या मूलभूत सुविधांकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. गावातील समस्या मार्गी लावण्यात याव्या यासाठी शिवसेनेचे अमोल व्यवहारे यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर केले आहेत मात्र त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे गावातील समस्यांचा दहा दिवसाच्या आत निपटारा न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ठराव केवळ कागदोपत्री
ग्रामपंचायतीने गावातील नादुरूस्त झालेल्या गटारींची दुरूस्ती, स्वच्छता मोहिम अशा विविध प्रकारच्या विकासकामांचा मासिक सभेत ठराव करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र या कामांना सुरूवात झाली नसल्याने ग्रामपंचायतीच्या दप्तरी करण्यात ठराव केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. विकासकामांच्या बाबतीत विचारणा केल्यास ग्रामसेवकाकडून टोलवा-टोलवीची उत्तरे दिली जातात.
आंदोलनाचा इशारा
गावातील ग्रामपंचायतीने दहा दिवसाच्या आत हातपंपाच्या दुरूस्तीसह विविध समस्यांचा निपटारा, गटारींच्या नवीन व दुरूस्तीच्या कामांच्या झालेल्या ठरावांची अंमलबजावणी न केल्यास शिवसेने तर्फे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा शिवसेनेचे अमोल व्यवहारे यांनी सोशल मिडीयातून इशारा दिला आहे.
अस्वच्छतेचा प्रश्न
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले जात आहे मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या माहेरच्या गावातच अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरीकांमध्ये आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे प्रशासनाने या समस्यांची दखल घेवून गावातील स्वच्छता व इतर समस्या तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.