नवी दिल्ली । कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह आणखी एका अधिकार्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावताच गुप्ता यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील रुद्रपूरमध्ये केएसएसपीएल कोळसा खाणीतील भ्रष्टाचाराप्रकरणी कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह दोन अधिकार्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी ठरवले होते. यूपीए सरकारच्या काळात गुप्ता हे दोन वर्ष सचिव म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी 40 कोळसा खाणींचे वाटप केले होते. मध्य प्रदेशातील थेसगोरा बी व रुद्रपुरी खाणी केएसएसपीएलला वाटप करताना गैरप्रकार केल्याच्या आरोप गुप्तांवर होता. सीबीआयचे विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी एच. सी. गुप्तांसह कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सहसचिव के. एस. कोफ्रा व संचालक के. सी. सामरिया यांनाही दोषी ठरवले होते. याशिवाय, केएसएसपीएल व त्याचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया यांनाही दोषी ठरवले होते.
केएसएसपीएलने कोळसा खाणीसाठी केलेला अर्ज अपूर्ण होता व तो मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वानुसार नसल्याने नाकारण्यात येण्याची शक्यता होती. तसेच आस्थापनेने त्यांची मालमत्ता फुगवून सांगितली व क्षमताही खोटी कथन केल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले होते. राज्य सरकारनेही या आस्थापनेची शिफारस केली नव्हती, असे सीबीआयने म्हटले होते. गुप्ता यांनी निर्णय घेताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही अंधारात ठेवल्याचा दावा केला गेला होता. सोमवारी न्यायालयाने याप्रकरणात शिक्षा सुनावली आहे.