माझा नवरा पॉर्न पाहतो; सगळ्या पॉर्न साइट करा बंद

0

मुंबई । माझा नवरा पॉर्न फिल्म पाहतो. त्या पाहण्याची सवयच त्याला लागली आहे. त्यामुळे आमचे नवरा-बायकोचे नाते संकटात सापडले आहे असे सांगत मुंबईतील एका महिलेने कोर्टात धाव घेतली. पॉर्न अ‍ॅडिक्ट नवर्‍याविरोधात सुप्रीम कोर्टात तक्रार केलेल्या या महिलेने शक्य तितक्या लवकर पॉर्न साइट बंद करा, असे आवाहनच या महिलेने कोर्टाला केले आहे. आमचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले आहे. पॉर्न साइट बंद केल्या तर नवरा रुळावर येईल, अशी अपेक्षा या महिलेने व्यक्त केली आहे.

माझे आयुष्य वाचेल
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या महिलेने आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की तिचा नवरा पॉर्न साइट बघण्याच्या नादात दैनंदिन कामेही करत नाही. एवढेच काय तर त्याने त्याच्या अनेक शारीरिक गरजांकडेही दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. माझ्यावर तो आता घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकतो आहे त्यामुळे शक्य असेल तेवढ्या लवकर या पॉर्न वेबसाइट्स बंद करा जेणेकरून माझे आयुष्य वाचेल, असे या महिलेने म्हटले आहे.

अन्यथा शोषणाचे गुन्हे वाढतील
या महिलेने फॅमिली कोर्टातही एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ज्यामध्ये तिचा पती तिच्याशी शारिरीक संबंधही ठेवू इच्छित नाही तसेच अनैसर्गिक संबंध ठेवण्यास तो आपल्याला भाग पाडतो असेही म्हटले आहे. या सगळ्या प्रकारामुळे माझे वैवाहिक आयुष्य संपुष्टात येते आहे. लग्नाच्या आधीपासूनच नवर्‍याला पॉर्न पाहण्याची सवय लागली असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात महिलेने स्पष्ट केले आहे. पॉर्न पाहणे हे आता मोबाइल आणि इंटरनेटमुळे अगदी सहज शक्य आहे. त्यामुळे देशाची तरूण पिढीही अधोगतीकडे चालली आहे. आपला अमूल्य वेळ अनेक तरूण पॉर्न बघण्यात घालवतात. त्यामुळेही या वेबसाईट बंद कराव्यात तसे न केल्यास महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार, विनयभंग असे गुन्हे वाढीला लागतील, असेही या महिलेने म्हटले आहे.