मुंबई : मी चूक केलीय असे वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे, असे किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. जयाजी सूर्यवंशींना काहीतरी मिळालंय, त्यामुळे त्यांनी तडजोड केलीय, त्यांनी शेतकर्यांची माफी मागावी अशी मागणी पुणतांब्यातील शेतकर्यांनी केली. त्यावर माझा बळीचा बकरा झालाय, मी नेता म्हणून सरकारकडे गेलो नाही. माझी चूक झाली, मी बिनशर्त सर्व शेतकर्यांची माफी मागतो, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा केली असली, तर शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे चित्र आहे. त्यातच किसान क्रांतीचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. जयाजी सूर्यवंशी यांना सरकारने ‘मॅनेज’ केल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सूर्यवंशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझी चूक झाली, पण मी शेतकर्यांसोबत कायम आहे. संप स्थगित केला होता, जर संप सुरु ठेवायचा असेल तर मी शेतकर्यांसोबत आहे, असे जयाजी सूर्यवंशी म्हणाले. याशिवाय मी कुणाच्या एका पैशाच्या मिंद्यात नाही, मी शेतकर्यांसोबत आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे, असे त्यांनी नमूद केले.