भोसरीमध्ये माजी आमदार लांडे यांचा वाढदिवसानिमित्त रंगला गौरव सोहळा
भाजप आमदारांनी घातले राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना साकडे
पिंपरी-चिंचवड : ‘भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे खरोखरच मोठे नेते आहेत. त्यांनी जनतेची खूप सेवा केली आहे. भोसरी म्हणजे राजकारणाचे विद्यापीठ असून त्याचे ते कुलगुरू आहेत. माझे आणि त्यांचे नाते खूप वेगळे आहे. ते माझे गुरु आहेत. त्यांना विधान परिषदेवर घेऊन आमदारांचा आमदार करा’, असे साकडे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घातले.
विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीमध्ये शुक्रवारी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे माजी उपमहापौर दिपक मानकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर हनुमंत भोसले, रंगनाथ फुगे, योगेश बहल, मोहिनी लांडे, वैशाली घोडेकर, वसंत लोंढे यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
…तर मी भाजपचा आमदार असतो : लांडे
यावेळी विलास लांडे म्हणाले की, आमचे मित्र लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला देखील कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याचा आग्रह केला. परंतु, माझी पवारसाहेब यांच्यावर निष्ठा आहे. त्यामुळे मी कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपमध्ये गेलो असतो तर पैसे खर्च न करता आमदार झालो असतो. मात्र, जानवे घालावे लागले असते. जे मला मान्य नव्हते. आज जरी मी सत्तेत नसलो तरी मी लोकांसाठी काम केले आहे आणि अजुनीही करत आहे. त्यामुळे मला लोकसेवा करता येते आहे, यातच मी आनंदी आहे.
विधान परिषदेत घेण्याची मागणी
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, लांडे यांना दहा वर्षांपासून मी विधानसभेत पहिले आहे. त्यांनी त्यांच्या मतदार संघातील अनेक प्रश्न अतिशय तडफेने विधानसभेत मांडले आहेत. त्यांची तळमळ पाहून आम्ही आमच्यासह विरोधी पक्षातील नेते व आमदार प्रभावीत होत असू. त्यांनी मांडलेले प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागत. त्यांना विधानपरिषदमध्ये घेण्याची मागणी केली जात आहे. विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीची एकच जागा आहे. याबाबत आता आमचे नेते शरद पवार निर्णय घेतील.