माझ्याशी चर्चा करा मगच भूमिका मांडा; राज ठाकरेंची पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तंबी

0

मुंबई- ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल ह्यांच्या उपस्थितीवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अधिकृत भूमिका स्पष्ट केलीआहे. नयनतारा सहगल यांच्या सारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल आणि त्या जर ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेत एक वाहक असतील तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही, असे त्यांनी सांगितले. ट्वीटरवरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये, अशी तंबी दिली आहे.

यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आले होते. या संमेलनाच्या त्या उद्घाटक होत्या. न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध दर्शवला होता.

मराठी साहित्यिक हे आपल्या राज्यातच नाहीत तर देशभरात आहेत. त्यांचे साहित्यही देशभरात वाचले जाते, असे असतानाही मराठी साहित्य संमेलनाला इंग्रजी साहित्यिकांना का बोलावलं जातं आहे? असा प्रश्न मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. या वादानंतर नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले होते. यावरुनही मोठा वादंग निर्माण झाला.