मुंबई-नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. १२ वर्षात त्यांची ११ वेळा बदली झाली आहे. दरम्यान वारंवार होणाऱ्या बदलीचा परिणाम माझ्या कुटुंबीयावर होतो. त्यांच्यामध्ये नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. भविष्यामध्ये माझ्या बदलीचा परिणाम मुलांवर होणार नाही याची काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
तुकाराम मुंढे यांनी बदली झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये नऊ महिन्याच्या कालावधीत अनेक नवीन कामे केली. त्याचा येथील युवकांना भविष्यात नक्कीच फायदा होईल. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्वच्छतेचा प्रकल्पही अखेरच्या टप्यात आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यामांतून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भविष्यात नाशिकमधील आर्थिक स्थिती सुधारेलेली असेल. भविष्यात येथील युवकांना कामासाठी इतर शहरात जायची गरज भासणार नाही, असा विश्वास यावेळी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच नाशिकचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिका प्रशासनात चांगले बदल घडले होते. दरम्यान, नाशिकमधूनच मुंढेंच्या बदलीला विरोध होत आहे. अनेक नागरीकांनी आज मुंढेंच्या बदलीला विरोध करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.