माणसाने काळाबरोबर बदलत रहावे : डॉ. भोईटे

0

म. फुले महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

पिंपरी : बदलत्या काळाबरोबर बदलत राहिले पाहिजे. स्वतःमध्ये बदल करत राहून रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थी घडविला जातो, असे मत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी व्यक्त केले. पिंपरी येथील रयत शिक्षणसंस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य भोईटे यांनी संस्थेच्या उभारणीविषयी, अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतलेल्या कष्टाविषयी व त्यागाविषयी माहिती दिली. माजी विद्यार्थी संघटनेतर्फे महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. मृदुला कर्णी, बबनराव सहाणे व प्रयोगशाळा सेवक राम माने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विनोद नढे, उद्योजक बाळासाहेब वाघेरे, नगरसेवक संदीप वाघेरे, पत्रकार अश्‍विनी सातव-डोके, प्रा. प्रेरणा उबाळे, मनोज बोरसे, सहआयुक्त गणेश सोनुने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महविद्यालयातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे चेअरमन डॉ. संभाजी शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय अश्‍विनी सातव-डोके यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कामयनी सुर्वे यांनी, तर आभार गणेश कस्पटे यांनी व्यक्त केले.