शिक्रापूर । माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने जमिनीवर असले पाहिजे. तसेच आपण ज्यांच्यामुळे मोठे झालो त्यांचे ऋण विसरू नये आणि आई वडिलांचा आदर करावा, दुसर्यांचे दु:ख पाहून ज्याच्या डोळ्यात पाणी येते तोच खरा माणूस, असे प्रतिपादन उद्योजक मयूर करंजे यांनी व्यक्त केले. माणुसकी जपणारीच माणसे मोठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
वढू खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मी कसा घडलो या विषयावर करंजे हे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरूर कार्याध्यक्ष मनोहर परदेशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भंडारे, मुख्याध्यापिका सुदर्शना शेलार, सचिन बेंडभर, मिना म्हसे, विजय वनवे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी करंजे यांच्या वतीने थोर व्यक्तींची पुस्तके शाळेला भेट दिली आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी दरेकर व वर्षा माकोडे यांनी केले तर मुख्याध्यापिका सुदर्शना शेलार यांनी आभार मानले.