कोल्हापूर । मुंबई येथील भाजप मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याशेजारी आणखी दोन-तीन कोठड्या शिल्लक आहेत, असा इशारा दिला होता. त्याला शरद पवार यांनी कोल्हापुरात सोमवारी प्रत्युत्तर दिले. ‘राज्यात भाजपची सत्ता आहे, मग ते कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट बघत आहेत, असे ते म्हणाले. उलट माणूस एकदा तुरुगांत जाऊन आला की पुढची निवडणूक त्याला सोपी जाते, असा टोलाही पवारांनी हाणला.
निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा मेळावा 10 जून रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. त्यावेळी पक्षाची नीती ठरवली जाईल. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत भाजपला फायदा होणार नाही यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी निवडणूक लढवावी, असे ते म्हणाले.
लोकांना विरोधक एकत्र हवे आहेत
उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल पाहिले तर लोकांना विरोधक एकत्र हवे आहेत. आमच्यामुळे भाजपचा फायदा होणार नाही, यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्रच असतात. संसदीय लोकशाहीविरोधात काम करणार्यांच्या विरोधात आम्ही आहोत. दीड महिन्यात 10 निवडणुकीत 8 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे, असे पवार यावेळी म्हणाले. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.