माण : तक्रार देण्यासाठी आलेल्या सास-याला तक्रार देऊ नको अशी धमकी जावायाने दिली. याबाबत पोलीस फिर्यादीस समाजवण्यास गेले असता आरोपीने पोलिसांनाच शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यात घडली.
हे देखील वाचा
प्रवीण बापू कसाळे (वय 27, रा. माण ग्रामपंचायत समोर, माणगाव, हिंजवडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अविनाश विठ्ठल बोराटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण कसबे पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्या गुन्ह्यात समज देण्यासाठी प्रवीणला पोलीस ठाण्यात बोलावले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून दिले. त्यानंतर प्रवीण याने घरी जाऊन त्याच्या सास-यांना मारहाण केली. त्यामुळे त्याचे सासरे हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. आरोपी प्रवीण सास-यांच्या मागून पोलीस ठाण्यात आला आणि सास-यांना तक्रार देऊ नका म्हणून धमकावू लागला. हा सगळा प्रकार पोलिस ठाण्यात सुरु असल्याने पोलीस हवालदार अविनाश बोराटे यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. बोराटे करीत असलेले सरकारी काम बंद पाडले.