दौंड हत्याकांडानंतर शहरात तणाव कायम
दौंड/पुणे : राज्य राखीव पोलिस दलात फौजदार असलेला संजय शिंदे याने मंगळवारी तिघांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर शहरात निर्माण झालेला तणाव दुसर्या दिवशीही कायम होता. त्यामुळे राखीव पोलिस दलाच्या काही तुकड्या दौंडमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. शिंदे हा अट्टल जुगारी असल्याचे स्पष्ट झाले असून, हत्या झालेल्यापैकी दोघे मटका अड्डा चालवित असल्याचेही पोलिस तपासात आढळून आले आहेत. त्यामुळे पैशाच्या वादावरूनच हे हत्याकांड घडले असल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले. दौंड पोलिस व एसआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी संजय शिंदे याची कसून चौकशी करत होते. शिंदे यांनी या हत्याकांडात दहा राउंड फायर केले असून, त्याच्याकडील पिस्तुल ही सरकारी आहे. तसेच, त्याच्याकडे आणखी 12 राउंडही मिळून आले आहेत. तसेच, त्याने पोलिसांना चकवा देत सुप्याकडे पळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सुपा येथून त्याला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.
तिहेरी हत्याकांड पूर्वनियोजित!
संजय शिंदे हा अनिल जाधव, गोपाळ शिंदे आणि परशुराम पवार तसेच इतरांबरोबर जुगार खेळत होता. जुगारात हरल्यामुळे शिंदेची त्यांच्याशी वादावादी झाली. त्यानंतर बोरावके नगर भागात शिंदेने त्याच्याकडील पिस्तुलातून जाधव यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो शिंदे आणि पवार यांच्या मागे गेला. नगर चौकी भागात त्यांना गाठून त्यांनाही गोळ्या घातल्या. भररस्त्यात सुरू असलेल्या या अंदाधुंद गोळीबारामुळे सर्वांची पळापळ झाली. गंभीर जखमी अवस्थेत तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता. अन्य एकजण जखमी झालेला आहे. प्रारंभी तो घरात लपून बसला होता. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घराला वेढाही घातला होता. परंतु, हा वेढा मोडून तो सुपा गावाकडे पळाला होता. त्याच्या वरिष्ठ अधिकार्याने त्याला भ्रमणध्वनी केला असता, आपण सोलापूरकडे जात आहोत, असे त्याने सांगितले. परंतु, त्याचे मोबाईल लोकेशन पाहिले असता तो शिरुरकडे जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करत सुपा गावात त्याच्या अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या होत्या. शिंदे हा एसआरपीएफमध्ये दारुगोळा विभागाचा प्रमुख असून, तेथूनच त्याने शस्त्रे चोरली असल्याचेही दिसून आले आहे. शिंदे याने सकाळीच शस्त्र व राउंड चोरली होती. त्यामुळे तिहेरी खुनाचा गुन्हा त्याने पूर्वनियोजितपणे केला असल्याचेही पोलिस तपासात आढळून आले असून, न्यायालयाने त्याला पोलिस कस्टडी दिल्याने दौंड पोलिस व एसआरपीएफचे वरिष्ठ अधिकारीही त्याची चौकशी करत होते.
पोलिसांना चकविण्याचा प्रयत्न फसला
ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांनीही आरोपी शिंदे याची तपासणी केली असून, त्याच्या चौकशीत गुन्हा घडविण्याच्या अगोदर त्याने दारुगोळा भंडारातून राऊंड व पिस्तूल घेतले असल्याचे चौकशीत सांगितले. त्यामुळे हे तिहेरी हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष एएसपी पखाले यांनी काढला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नागरे-पाटील यांनीही या गुन्ह्याची सविस्तर माहिती घेत तपासकामी पोलिसांना मार्गदर्शन केले आहे. काल शिंदे याला त्याच्या पोलिस निरीक्षकांनी फोन केला असता, त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आपण सोलापूरच्या दिशेने जात असल्याचे त्याने सांगितले. परंतु, त्याच्या फोन लोकेशनवरून तो खोटे बोलत असल्याचे आढळून आला. त्याला सुपा येथून अटक करण्यात आली, त्यावेळी त्याच्याकडे नऊ एमएम पिस्तुल, आणि दोन मॅगजिन त्याच्याकडे सापडले, असेही नागरे-पाटील यांनी सांगितले. अनिल जाधव, गोपाळ शिंदे आणि परशुराम पवार अशी हत्या झालेल्यांची नावे असून, संजय शिंदे जुगारात हरल्याने त्याचे गोपाळशी पैशावरून भांडण झाले होते. तर त्यात पवार याने मध्यस्थी केली होती. त्यामुळे या दोघांनाही शिंदे याने गोळ्या घातल्या. तर जाधव हा मटका अड्डा चालवित असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले.