माथेरान । गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस.टी.हे शासनाचे ब्रीदवाक्य काहीअंशी माथेरान करीता फोल ठरत असल्याने जवळपास चार दशकानंतर मिनिबस सेवेचे स्वप्न पूर्णत्वास आले खरे परंतु त्यानंतर बस सेवेबाबत तिच्या वाढीव फेर्यांबाबत आजवरच्या स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारे गांभीर्याने न घेतल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी कर्जत -माथेरान बससेवा आहे. मात्र, सध्यातरी ही बससेवा केवळ औषधालाच उरल्याचे दिसत असल्याने मर्यादित फेर्या तसेच शनिवार -रविवारी जेमेतेम तीन फेर्या होत आहेत. नवीन दोन बसेस उपलब्ध असताना एकच बस या मार्गावर सुरू असून दूसरी बस कर्जत ते पनवेल फेर्या करीत आहे. याचा नाहक त्रास स्थानिकांना होत आहे. स्वतःची वाहने असल्याने राजकीय मंडळींना याबाबत काहीएक स्वारस्य दिसत नाहीत.
आधीही झाले उपोषण
मागील काळात 2008 मध्ये मिनिबसच्या फेर्या वाढविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फतअध्यक्ष संतोष कदम यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली श्रीराम चौकात आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर विद्यमान तत्कालीन नगरसेवक दिनेश सुतार यांनी सुद्धा याच बसच्या गलथान कारभारा बाबतीतकर्जत बस आगारा समोरच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आमरण उपोषण केले होते. त्यावेळेस आश्वासन देऊन प्रशासनाने थोड्या प्रमाणात तजवीज केली होती.
स्थानिकांकडून अनेकदा निवेदने दिलेली आहेत. सध्या दोन नवीन बसेस उपलब्ध आहेत.परंतु या मार्गावर एकच बसचा वापर होत आहे. यामुळे जेष्ठ नागरिक,विद्यार्थी यांना त्रास होत आहे. त्यामुळे बसच्या फेर्या वाढवून उत्पन्नात भर पडण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत.
-शिवाजी शिंदे,
विरोधीपक्ष नेता माथेरान नगरपालिका
मिनिबसचा स्टॅण्ड हा रेल्वे स्टेशन जवळच असणे जरूरी आहे. बससाठी पायपीट करतांना सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. प्रवाशांना खाजगी वाहनांचा वापर करून अधिक रक्कम खर्च करावी लागत आहे. यासाठी मिनिबस एस.टी.स्टॅण्ड येथेच उपलब्ध होण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न असावेत.
-केतन रामाणे
कोकणवासीय समाज पाध्यक्ष, माथेरान