माथेरान । अनेक वर्षांपासून इथल्या स्थानिकांच्या निवासी वास्तुंवर नगरपालिकेने अनधिकृत मोहोर लावलेली आहे. आजतागायत ही घरे अधिकृत घोषित नसल्याने स्थानिकांना शासनाच्या अनेक जाचक निर्बंधांना सामोरे जावे लागत आहे. घरांची डागडुजी अथवा दुरुस्ती सुध्दा करता येत नाही. याकामी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी दि.20 रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना लेखी निवेदन देऊन राज्य शासनाने नगरपालिका क्षेत्रांतील 2015 पर्यंतची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा केलेली आहे.
माथेरानमधील 2015 पर्यंतची बांधकामे सुद्धा अधिकृत करावी या आशयाचे लेखी निवेदन भेटून दिले. माथेरानमधील बहुतांश मालमत्ता हेरिटेज असून, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथील सर्वच मालमत्ता शासन जमा आहे. या मालमत्ता शासनाने भाडेतत्त्वावर संबंधिताना विविध कारणास्तव वापरण्याकरिता तसेच देखभाल व दुरुस्ती कामी दिलेल्या आहेत.
मोकळ्या जागेत झाली किरकोळ स्वरूपाची बांधकामे
माथेरान नियमावली 1959 नुसार येथे 256 माथेरान भूखंड अस्तित्वात आहेत. त्यानंतर 254 एम.पी.भूखंड आहेत. सदरच्या भूखंडांपेक्षा कोणत्याही प्रकारची यामध्ये वाढ झालेली नाही. माथेरान भूखंडाचे आकारमान, क्षेत्रफळ मोठे असून त्यामानाने बाजार भूखंडाचे क्षेत्रफळ फारच अत्यल्प आहे. सर्वसाधारपणे बाजार वस्तीत असणार्या दाट वस्तीत 254 भूखंड असून 1905 पासूनच या स्थळावर वास्तव्यास आहेत. दरवर्षी लोकसंख्येमुळेच कुटुंब वाढत आहेत.
त्याप्रमाणात गावठान हद्द व त्यांच्या सीमा वाढतात. घरांची संख्या साधण्यासाठी घरांची निर्मिती करता येते. परंतु येथील सर्वच मालमत्ता व जमीन हद्द वाढलेली नाही. इथे कोणत्याही प्रकारे औद्योगिक उद्योग, व्यवसाय नाही. संपूर्ण भाग बिनशेतीचा आहे. पर्यायाने असलेल्या केवळ 254 भुखंडामध्ये स्थानिक मंडळी वास्तव्यास असून पूर्वी जर एखाद्या घराच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत किरकोळ स्वरूपाचे बांधकाम करून निवासाची सोय करून लोक राहू लागले आहेत.