मादक औषधे विकणारा केमिस्ट पोलिसांच्या जाळ्यात

0

धुळे । प्रतिबंधित मादक औषधांची खुलेआम विक्री करतांना एका केमिस्टला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडून दोन स्ट्रिप गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. केमिस्टला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव रोड पोलिसांनी काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे प्रतिबंधित औषधे मिळून आलीत. त्याची कसून चौकशी केली असता त्याने झोडगे येथून औषधे विकत घेतल्याचे पोलिसांना सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील तरुण अशाप्रकारच्या गोळ्यांचे सेवन करत असल्याची कुणकुण पोलिसांनाच होतीच. त्यामुळे या समस्येला मुळासकट उखडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसत तपासाची चक्रे वेगात फिरविलीत.

औषधीचा साठा जप्त
तपासाचे धागेदारे जमा करत करत पोलीस झोडगे (ता.मालेगाव) पर्यंत पोहोचले. बस स्टॅण्ड समोर असलेल्या महावीर मेडिकल येथूनच मादक व उत्तेजक द्रव्यांची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक एस.चैतन्या,उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय एच.एच. पाटील यांच्या टिमने सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी एक बनावट ग्राहक महावीर मेडीकल येथे पाठविण्यात आला. यावेळी दुकान मालक गौतम प्रकाश चौरडीया याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित औषधे दिलीत. लागलीच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून औषधांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान तहसीलदार ज्योती देवरे देखील उपस्थित होत्या. पो.कॉ. साहेबराव भदाणे यांच्या फिर्यादीवरुन चौरडीया विरोधात गुन्हा दाखल केला.