मुंबई । प्रसिद्ध लोकांच्या मेणाच्या पुतळ्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मादाम तुसाच्या दिल्लीतील संग्रहालयात आता लाखों श्रोत्यांच्या मनात घर करून असलेल्या लोकप्रिय पार्श्वगायिका आशा भोसले यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात येणार्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरणार आहेत. गेली सहा दशकांपासून 83 वर्षीय आशा भोसले या भारतीय संगीत रसिकांना आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे. मादाम तुसामध्ये आशा भोसलेंचा मेणाचा पुतळा त्यांचा मोठा गौरव असेल. मादाम तुसामध्ये माझा मेणाचा पुतळा उभारणे माझ्यासाठी मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा माझ्यासाठी आनंददायक अनुभव आहे. मी माझा मेणाचा पुतळा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. असे आशा भोसले यांनी सांगितले.
आशा भोसले यांचा मेणाचा पूर्णाकृती पुतळा मादाम तुसामध्ये बॉलिवूड म्युझिक झोनमध्ये लावण्यात येईल. कोणत्याही भारतीय गायिकेला आजपर्यंत हा सन्मान मिळालेला नाही, त्यामुळे आशा भोसले पहिल्याच गायिका ठरणार आहे. आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. दिल्लीतील मादाम तुसा संग्रहालयाची देखभाल मलर्नि एंटरटेनमेंट ठेवणार आहे. या संग्रहालयात भारतातील खेळ, राजकारण, संगीत, इतिहास, संशोधन, आदी क्षेत्रांतील 50 दिग्गजांचे पुतळे उभारण्यात येणार आहे. मादाम तुसा संग्रहालयात मेणाचा पुतळा बसवण्यात येणार असल्यामुळे आशा भोसले यांनी समाधान व्यक्त केले असून हा माझ्या गायकीचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया दिली.