माद्रिदने बार्सिलोना नावावर असलेल्या विक्रमाशी बरोबरी

0

माद्रिद। रिअल माद्रिदने येथे झालेल्या लिगा फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात ग्रॅनडा क्लबवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली. या विजयासह माद्रिदने बार्सिलोनाच्या नावावर असलेल्या सर्वाधिक 39 सामन्यांत अपराजित राहण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. इस्कोचे दोन गोल व करिम बेन्झेमा, ख्रिस्तियानो रोनाल्डो व सॅसेमिरो यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर माद्रिदने अपराजित मालिका कायम राखली.

माद्रिद येथील सँटीयागो बेर्नाबेऊ स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या लढतीपूर्वी एका औपचारिक सोहळ्यात रोनाल्डोला बलॉन डी’ओर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र, 12व्या मिनिटाला इस्कोने बेंझेमाच्या पासवर गोल करून सर्वाचे लक्ष वेधले. 20व्या मिनिटाला ग्रॅनडाच्या गोलरक्षकाच्या हातून निसटलेल्या चेंडूवर बेन्झेमाने गोल करून माद्रिदची आघाडी दुप्पट केली. 27व्या मिनिटाला रोनाल्डोचा करिष्मा पाहायला मिळाला. मार्सेलो डा सिल्व्हाच्या पासवर रोनाल्डोने अप्रतिम हेडरद्वारे गोल करून माद्रिदची आघाडी 3-0 अशी मजबूत केली. चार मिनिटांनंतर इस्कोने पुन्हा एक गोल केला. 37व्या मिनिटाला ग्रॅनडाच्या गोलरक्षकाने इस्कोचा हॅट्ट्रिकचा प्रयत्न अपयशी ठरवला.मध्यंतरानंतर ग्रॅनडाने चिवट खेळ केला. 58व्या मिनिटाला सॅसेमिरोने जेम्स रॉड्रिगेजच्या पासवर गोल करून माद्रिदच्या विजयावर 5-0 अशी शिक्कामोर्तब केले.